औरंगाबाद : कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणाला तोडण्यासाठी १४ एप्रिलपर्यंत शासनाकडून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलेली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक भागात राशन व खाण्यापिण्याच्या सामानासाठी लोक गर्दी करत असल्याचे निदर्शनास येत आहे.

 

लोकांनी २१ दिवसांच्या या लॉकडाऊनमुळे घाबरुन जाण्याचे कारण नाही तीन महिने पुरेल इतके धान्य शासनाकडे उपलब्ध आहे तसेच नागरीकांनी आपआपल्या घरातच राहावे असे आवाहन खासदार इम्तियाज जलील यांनी केले आहे.


खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद जिल्हा पुरवठा अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यासोबत आज तात्काळ बैठक घेवुन शासनाकडून सर्वसामान्य लोकांना दिल्या जाणाऱ्या धान्य व इतर सुविधेबाबत सविस्तर चर्चा केली. औरंगाबाद जिल्ह्यात एकुण १८०२ राशन दुकाने आहेत.

 

या दुकानामधून राशनकार्ड धारकांना शासनाच्या नियमाप्रमाणे रास्त दरात धान्य दिल्या जाते. राशनकार्ड धारकांना प्रती व्यक्ती ३ किलो गहु २ रुपये प्रति किलो, तांदुळ २ किलो ३ रुपये प्रति किलो, दाळ १ किलो ३५ रुपयात तसेच साखर १ किलो २० रुपये या शासनाच्या दराने राशन सकाळी ८ ते १२ व संध्याकाळी ४ ते ८ या वेळेत उपलब्ध करुन दिले जात असल्याची माहिती खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी दिली.

 

औरंगाबाद जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी आश्वासित केले आहे की, औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व जनतेला एप्रिल ते जुन असे तीन महिण्यापर्यंत पुरेल इतके धान्य शासनाकडे उपलब्ध आहे कोणीही चिंता करण्याचे काहीही कारण नाही.

 

खासदार इम्तियाज जलील यांनी लोकांना आवाहन केले आहे की, औरंगाबाद जिल्ह्यातील कोणतीही राशन दुकान बंद असेल अथवा दुकानदार राशनकार्ड धारकांना धान्य उपलब्ध करुन देत नसेल तर त्यांची जिल्हा पुरवठा व तालुका पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी. अशा सर्व दुकानदाराविरुध्द तात्काळ शासनाकडून कार्यवाही करुन त्यांचे परवाना रद्द करण्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना सुचना दिल्या.


खासदार इम्तियाज जलील पुढे बोलतांना म्हणाले की, औरंगाबाद जिल्ह्यात 19 लक्ष राशन कार्ड धारक आहे. तसेच याव्यतिरिक्त दारिद्रय रेषेच्या अत्यंत खाली असलेल्या लोकांना शासनाकडून अंत्योदय योजना राबविण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून लोकांना प्रत्येक महिना २३ किलो गहु, १२ किलो तांदुळ उपलब्ध करुन दिले जाते. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एकूण ६३००० लाभार्थी असुन यांना जर योजनेचा लाभ त्वरीत देण्यात आला तर कोणावरही उपासमारीची वेळे येणार नाही.

 

Find out more: