मुंबई : राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस आहे. कोरोनाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये राजकीय श्रेयवाद सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींवर राज्याचा आढावा घेण्याची जबाबदारी दिली आहे. मात्र मोदींच्या या निर्णयावर राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आक्षेप घेतला आहे.
“कोरोनाच्या संकटावर महाविकासआघाडी सरकार उत्तम पद्धतीने उपाययोजना करत आहे. याबाबत केंद्र सरकारने नितीन गडकरींवर महाराष्ट्राची जबाबदारी दिल्याचे कळतं आहे. ही जबाबदारी समन्वयाची असेल अशी अपेक्षा आहे, पण समन्वयाऐवजी समांतर जबाबदारी असेल तर ते योग्य वाटत नाही,” असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.
या ट्विटद्वारे रोहित पवार यांनी अप्रत्यक्षरित्या पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. रोहित पवार यांनी ट्विटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नितीन गडकरींनाही टॅग केलं आहे.
गुरुवारी सकाळी नरेंद्र मोदी यांनी गडकरी यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला होता. त्यावेळी राज्यात कोरोनासंदर्भात केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांचे पालन होतं की नाही. तसेच केंद्र शासनाच्या मदतीची आवश्यकता आहे का? याची जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा करण्यास सांगितले होते.
यानंतर गडकरी यांनी 17 जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधत नेमकी स्थिती जाणून घेतली. केंद्रीय गृह विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाद्वारे देण्यात आलेल्या निर्देशांची अमलबजावणी स्थिती जाणून घेतली. त्यासोबतच कायदा आणि सुव्यवस्था, अन्नपुरवठा, वाहतूक इत्यादीबाबत गडकरींनी विचारणा केली.
तसेच कोणत्याही मदतीची आवश्यकता असेल तर थेट मला संपर्क करा असेही गडकरींनी यावेळी सांगितले. त्यामुळे कोरोनाच्या मुद्द्यावरुन राजकीय श्रेयवाद लाटण्याचे काम सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.