नवी दिल्ली : कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देभरात लॉकडाऊनची घोषणा केली. मात्र, या लॉकडाऊनमुळे देशातील गरीब, होतकरु नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं समोर येत आहे.
याच पार्श्वभूीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांची ‘मन की बात’मध्ये माफी मागितली. मात्र, कोरोनाविरोधात लढण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?
“सर्वात अगोदर मी देशाच्या सर्व नागरकांची माफी मागतो. नागरिक मला माफ करतील, असा मला विश्वास आहे. काही कठोर निर्णय घेतल्यामुळे लोकांना खूप त्रास होत आहे.
विशेष करुन माझ्या गरीब नागरिकांना जास्त त्रास होत असेल. त्यांना असं वाटत असेल की, असा कसा पंतप्रधान आहे ज्याने आम्हाला संकटात टाकलं, मी त्यांची खरच माफी मागतो. भरपूर लोक माझ्यावर नाराज असतील”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
“तुमच्या अडचणी मी समजू शकतो. मात्र, भारतात 130 कोटी लोकसंख्या आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी हे पाऊल उचलण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. कोरोनाविरोधातील ही लढाई जीवन आणि मृत्यू दरम्यानची लढाई आहे.
ही लढाई आपल्याला जिंकायची आहे. त्यामुळेच हा कठोर निर्णय घ्यावा लागला. आपल्याला आणि आपल्या परिवाराला सुरक्षित ठेवायचं आहे”, अशी ग्वाही नरेंद्र मोदींनी दिली.
“कोरोनाविरोधात लढण्यासाठी डॉक्टर्स आणि नर्सेस खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. कोरोनाविरोधात लढणारे हे खरे सैनिक आहेत. मी या सैनकांशी गेल्या काही दिवसात फोनवर चर्चा केली.
मला त्यांच्याशी बोलून खूप प्रेरणा मिळाली. ही प्रेरणा ‘मन की बात’च्या माध्यमातून आपल्या सर्वांना घ्यायची आहे. त्यामुळे आज ते त्यांचा अनुभव ‘मन की बात’मध्ये मांडणार आहेत”, असं मोदींनी सांगितलं.
यावेळी कोरोनावर मात केलेल्या व्यक्तीला आपला अनुभव देशातील नागरिकांसमोर मांडण्याचे आवाहन मोदींनी केले. कोरोनाच्या विळख्यातून सुखरुप बाहेर आलेल्या व्यक्तीने सरकारचे सर्व सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केलं. यावेळी मोदींनी त्या व्यक्तीला आपला अनुभव सोशल मीडियावर शेअर करण्याचा सल्ला दिला.