मुंबई – उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राज्यभरातील १२ लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी २ हजारांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. हे पैसे राज्यातील मजुरांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. या मजुरांचे कोरोनाच्या संकटकाळात सर्वाधिक हाल होत आहेत.

 

हा निर्णय त्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. देशभरातील लॉकडाउन ३ मे पर्यंत असून या लॉकडाउनचे सर्वाधिक चटके मजूर वर्गाला बसत आहेत.

 

त्यांना काहीसा का होईना आर्थिक दिलासा देता यावा म्हणून हा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. सर्व प्रकारचे बांधकामं सध्या बंद असल्यामुळे या मजुरांवर बेकारीचे संकट ओढवले आहे. अशा परिस्थितीत इतर राज्यांनीही मजुरांना मदत केली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही आता या सगळ्यांना मदतीचा हात दिला आहे.

 

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या लक्षात घेतली तर सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. अशा सगळ्या परिस्थिती बांधकाम कामगारांना आर्थिक अडचण सहन करावी लागत असल्यामुळे त्यांना प्रत्येकी २ हजारांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.


महाराष्ट्र राज्य बांधकाम मजूर मंडळात या बांधकाम मजुरांचा हक्काचा पैसा जमा आहे. ९ हजार कोटींच्या घरात जमा असलेली रक्कम आहे. सेसच्या रुपाने ही रक्कम बांधकाम व्यावसायिकांकडून राज्य सरकार घेते.

 

त्यामुळे कोरोनासारखा संकट काळ समोर आलेला असताना आता बांधकाम मजुरांच्या खात्यात पैसे जमा केले जावे असा प्रस्ताव राज्याच्या कामगार विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला होता. त्यानुसार मदतीच्या स्वरुपात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे.

Find out more: