नवी दिल्ली : देशात सध्याच्या घडीला जीवघेण्या कोरोना व्हायरसचे तांडव सुरु असतानाच देशातील काही राजकारणी मंडळी ही त्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे चर्चेत येत आहेत. सध्या भाजपच्या अशाच एका आमदाराच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावत आहे. मुस्लिम भाजी विक्रेत्यांकडून भाजी खरेदी करु नये, असे आवाहन केले आहे.
या भाजप आमदार महोदयांचे नाव सुरेश तिवारी असे असून, त्यांनी हे आवाहन देओरिया या जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे. सध्या सोशल मीडियावर बारहाज मतदार संघातील प्रतिनिधी असणाऱ्या सुरेश तिवारी यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये ते एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुम्हा सर्वांना जाहीरपणे सांगतो मुस्लिम विक्रेत्यांकडून तुम्ही भाजी खरेदी करु नका, असे म्हणताना दिसत आहेत. खुद्द तिवारी यांनीच आपण हे वक्तव्य मागील आठवड्यात केल्याची माहिती दिली. नगर पालिकेच्या भेटीवर गेले असता त्यांनी हे वक्तव्य केले होते, जिथे काही शासकीय अधिकारीसुद्धा उपस्थित होते.
कोरोना विषाणूचा प्रसार करण्यासाठी म्हणून हे विक्रेते थुंकीचा वापर करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आपण नागरिकांना त्यांच्याकडून भाजी खरेदी न करण्याचा मी त्यांना सल्ला दिला, या परिस्थितीनंतर त्यांना जे करायचे आहे, तसे त्यांनी करावे, असे अतिशय बेताल वक्तव्य त्यांनी केले. यासंदर्भातील वृत्त ‘इंडियन एक्सप्रेस’ने दिले आहे.
आपण फक्त आपले मत व्यक्त केलं असून, त्याचे पालन करायचे की नाही हे नागरिकांनीच ठरवावे अशा भूमिकेवर हे आमदार महोदय ठाम आहेत. दिल्लीतील तबलिगी जमातच्या कार्यक्रमातील परिस्थितीचा संदर्भ देत या लोकांनी देशासोबत काय केले, हे सर्वजण पाहूच शकतात अशा शब्दात त्यांनी आपल्या वक्तव्याविषयी स्पष्टीकरण दिले आहे.