पुणे : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने देशातील लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. मात्र लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांचा घरी परतण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर पुणे शहर आणि जिल्ह्यातून परराज्यात जाणाऱ्या 68 हजार विद्यार्थ्यांसह कामगारांची यादी जिल्हा प्रशासनाकडून तयार करण्यात आली. संबंधित राज्यातून किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी मिळाल्यानंतरच हे सर्वजण मूळगावी जाऊ शकणार आहेत.
पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातून आणि जिल्ह्यातून इतर राज्यात जाणाऱ्या 68 हजार कामगार, विद्यार्थ्यांची यादी तयार केली आहे. ही यादी लवकरच संबंधित राज्याकडे आणि जिल्ह्यात पाठवली जाणार आहे. याबाबत परवानगी मिळाल्यानंतर कामगार आणि विद्यार्थी आपल्या मूळगावी जाऊ शकणार आहेत.
मात्र परराज्यात किंवा इकर जिल्ह्यात जाणाऱ्यांना स्व:खर्चाने जावे लागणार आहे. तसेच एका राज्यात एक हजारांपेक्षा जास्त नागरिक जाणारे असल्यास त्यासाठी स्वतंत्र रेल्वे दिली जाणार आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान काल पुण्यातील स्थलांतरिताची पहिली यादी तयार करण्यात आली होती. यात 15 हजार 502 परप्रांतीयांचा मूळ गावी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यात सर्वाधिक मजूर हे उत्तरप्रदेश आणि बिहारचे रहिवाशी आहे.
उत्तर प्रदेशातील जवळपास 4 हजार 048 आणि बिहारमधील 3 हजार 810 नागरिकांचा या यादीत समावेश आहे. त्याच बरोबर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जाणाऱ्या 583 नागरिकांनीही यात नोंदणी केली आहे.