
औरंगाबाद : मालवाहू ट्रेनखाली चिरडून 16 मजुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये समोर आली आहे. रात्रीच्या वेळेस रेल्वे रुळावरच विश्रांती घेण्यासाठी झोपलेल्या मजुरांचा पहाटेच्या सुमारास करुण अंत झाला. औरंगाबाद-जालना रेल्वे मार्गावर करमाड शिवारात एमआयडीसीच्या निर्माणाधीन पुलाजवळ ही दुर्घटना घडली.
लॉकडाऊनमुळे जालन्यात अडकलेले मजूर रेल्वे रुळावरुन औरंगाबादच्या दिशेने पायी येत होते. रात्री थकल्यावर रेल्वे बंद असल्याचा विचार करुन मजुरांनी रुळावरच झोप घेतली असावी, असा अंदाज आहे.
पहाटे 6.30 वाजताच्या सुमारास अचानक आलेल्या मालवाहू रेल्वेखाली हे मजूर चिरडले गेले. मालगाडीने 19 मजुरांना धडक दिली. यामध्ये 16 मजुरांचा ट्रेनखाली चिरडून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिघे जण जखमी आहेत.
यामध्ये लहान मुलांचा समावेश असल्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.हे परप्रांतीय मजूर मध्य प्रदेशातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. करमाड पोलीस दुर्घटनास्थळी अधिक तपास करत आहेत.