मुंबई : “रोहित तू तुझ्या मतदारसंघाकडे लक्ष दे”, असा सल्ला माजी खासदार निलेश राणेयांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना दिला आहे. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साखर उद्योगासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते.
या पत्रामध्ये पवारांनी साखर उद्योग अडचणीत सापडला आहे. त्याला केंद्र सरकारने मदत करावी अशी मागणी केली होती. यानंतर निलेश राणेंनी ट्विटरवरुन साखर विषयावर किती पैसे महाराष्ट्रात खर्च झाले यावर ऑडिट झाले पाहिजे, असं म्हटले होते. या ट्वीटवर रोहित पवार यांनी उत्तर दिल्याने सध्या या दोन तरुण नेत्यांमध्ये ट्विटर वॉर सुरु असल्याचे दिसत आहे.
निलेश राणे म्हणाले, “साखर विषयावर किती पैसे महाराष्ट्रात खर्च झाले यावर ऑडिट झालंच पाहिजे. साखर कारखाने करोडोंची उलाढाल करतात, राज्य सरकार, राज्य बँक, जिल्हा बँका सगळे साखर व्यवसायाला वर्षों वर्ष साथ देत आलेत. तरी वाचवा??”
निलेश राणेंच्या या ट्वीटनंतर रोहित पवार यांनी निलेश राणे यांना उत्तर देत ट्वीट केले होते. “मी आपणास सांगू इच्छितो की शरद पवार यांनी साखर उद्योगासह ‘कुक्कुटपालन’ आणि इतर उद्योगातील दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठवून उपाययोजना सुचवल्या आहेत.
शरद पवार प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असल्यानेच पंतप्रधान मोदी त्यावर सकारात्मक विचार करतात. त्यामुळे काळजी नसावी”, असं ट्वीट करत रोहित पवार म्हणाले.
मात्र रोहित पवारांच्या या ट्वीटनंतर निलेश राणे हे चांगलेच भडकले. यानंतर निलेश राणेंनी ट्वीट करत रोहित यांच्यावर टीका केली.
निलेश राणे म्हणाले, “मी साखरेवर बोललो पवार साहेबांवर नाही. कुकुटपालनाची मागणी केली असेल तर तुझ्यासाठी चांगली आहे, तुला गरज आहे. साखरेवर बोल्यावर मिरची का लागली??? मतदार संघावर लक्ष दे सगळी कडे नाक टाकू नकोस नाही तर साखरकारखान्या सारखी हालत होईल तुझी.”
“हे रोहित पवार सारखे शेंबडे लुडबुड करत असतात. साखरेवर बोललो की हे अस्वस्थ का होतात कुणास ठाऊक?? महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणात संपत्ती एका दिशेने जात असेल तर प्रश्न नाही विचारायचे?? ह्या वांग्याला सांगा ते ठाकरे मुंबईत राहून नाय काय करू शकले हा तर अजून स्वतःची धुवायला शिकतोय”, असंही ट्वीट करत निलेश राणे यांनी रोहितवर टीका केली.