
राज्याला केंद्र सरकारकडून 22 हजार कोटींचा निधी मिळणार आहे. मात्र अद्यापही निधी तर काही मिळाला नाही पण केंद्राकडून कर्ज काढा, असं सांगण्यात येत आहे. म्हणजेच केंद्र सरकार राज्याला कर्जाच्या खाईत ढकलण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
कोरोनाचं संकट आहे. त्यात लॉकडाऊनचा मार्ग पंतप्रधानांनी देशाला दाखवला. त्यानंतर सांगितलं आत्मनिर्भर व्हा. सगळ्या नाड्या आवळायच्या आणि सांगायचं श्वास घ्या असं हे सांगण्यासारखं आत्मनिर्भर व्हा सांगणं आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी थेट मोदींवर निशाणा साधला. ठाकरे विधान परिषदेत बोलत होते.
आम्ही सत्ताधारी पक्ष आणि तुम्ही विरोधी पक्ष आपण मराठी मातीची लेकरं आहोत. त्यामुळे कधीतरी महाराष्ट्रासाठी एकटवून केंद्राला जाब विचारणार की नाही?, असा सवाल ठाकरेंनी विरोधी पक्षाला केला.
दरम्यान, संकटाच्या काळात आपण एकवटणार नाही तर मग कधी एकवटणार आहोत?, येत्या 15 तारखेपासून आपण कोरोनाचा आक्रमकपणे सामना करणार आहे. यासाठी सर्वांनी मिळून या संकटाला सामोर जायचं असून त्यासाठी मला तुमच्या सहकार्याची गरज असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.