भारताचा कॉमनवेल्थ आणि एशियाड गेम्सचा सुवर्णपदक विजेता पैलवान बजरंग पुनीया याचा खेलरत्न पुरस्कारने गौरव करण्यात येणार आहे. पुनीयाच्या नावाची केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली होती. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावाने क्रीडा क्षेत्रातील केंद्र सरकारचा हा सर्वोच्च पुरस्कार आहे. केंद्र सरकारच्या 12 सदस्यीय समितीने एकमताने बजरंगच्या नावाची निवड केली.
येत्या 29 ऑगस्ट म्हणजे क्रीडादिनाला खेलरत्न, अर्जुन आणि द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक आणि रोख साडे सात लाख रूपये असे खेलरत्न पुरस्कारचे स्वरूप आहे. दरम्यान, आजपर्यंत सुशिलकुमार, योगेश्वर दत्त आणि साक्षी मलिक यांना खेलरत्न पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे. तर मागच्या वर्षी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि वेटलिफ्टर मीराबाई चानु यांना या पुरस्कारने गौरविण्यात आले आहे.