रवाईन हॉटेल यांच्या तर्फे व मालाज पुरस्कृत पाचगणी येथे होणाऱ्या चौथ्या मालाज रवाईन रन माउंटन मॅरेथॉन स्पर्धेत भारतासह केनिया, आफ्रिकामधून 2000हुन अधिक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला आहे. ही शर्यत पाचगणी येथे 22सप्टेंबर रोजी रंगणार आहे.

पाचगणी येथे होणाऱ्या या मॅरेथॉन स्पर्धेला माला यांचा पाठिंबा लाभला आहे. विशेष म्हणजे यावर्षी ‘स्टेअर वे टू रन’ या संकल्पने अंतर्गत स्पर्धेत अजय देसाई,सुशील शर्मा, युसुफ देवासवाला, विशाल गुलाटी, श्यामल मोंडल, सतनाम सिंग, अझिझ मास्टर, नरेश ठाकुर, मुरली पिल्ले, प्रिती मस्के हे 10 अल्ट्रा रनर धावपटू पुणे ते पाचगणी अशी 101 किलोमीटरची स्पर्धा पार करणार आहेत.

तसेच, याचबरोबर या स्पर्धेत 18वर्षावरील स्पर्धकांसाठी 21किलोमीटर, 16वर्षांवरील स्पर्धकांसाठी 10किलोमीटर, 10वर्षावरील स्पर्धकांसाठी माला 5किलोमीटर रन अशा तीन प्रकाराचा समावेश आहे. रवाईन माउंटन मॅरेथॉन स्पर्धेत यावर्षी एकूण 3लाख रुपयांची पारितोषिक रक्कम देण्यात येणार आहे. सातारा हिल मॅरेथॉनचे आयोजक डॉ.संदीप काटे हे या शर्यतीचे संचालक आहेत.

यंदाची शर्यत ही पाचगणी येथील संजीवन हायस्कुल येथून सुरु होणार असून संपूर्ण शहरातून तसेच ऐतिहासिक सेंट पिटर्स स्कुल येथून आणि ऐतिहासिक अशा भव्य वृक्ष राजीतून आणि पाचगणी व महाबळेश्वरच्या निसर्गरम्य अशा पर्वतरांगामधून, तसेच राजपुरी केव्स मार्गे जाऊन परत फिरणार आहे व संजीवन मैदान येथेच या शर्यतीचा समारोप होणार आहे.

रवाईन रन माउंटन मॅरेथॉन ही शर्यत अस्सल धावपटूसाठी खास आकर्षण ठरणार आहे. तसेच, ज्यांचे धावण्यावर अतिशय प्रेम आहे, अशा हौशी धावपटूसाठी ही शर्यत विशेष आकर्षण ठरणार आहे. या शर्यतीतील विजेत्यांबरोबरच सर्व सहभागी धावपटूना पारितोषिक रक्कम देण्यात येणार आहे, तसेच, शर्यत पूर्ण करणाऱ्या धावपटूंना स्ट्रॉबेरी ट्रीट अशी खास ट्रीट देण्यात येणार आहे. तसेच, पाचगणीतील अनेक हॉटेल्स मध्ये सवलतीच्या दरात मुक्काम करण्याची संधी त्याचप्रमाणे टीशर्ट व पाचगणीतील अनेक खास वस्तूंचा समावेश असलेली गुडी बॅग्स, पदके व टाईम बीब देण्यात येणार आहे.



Find out more: