
पुरुषांची मक्तेदारी मानल्या जाणाऱ्या क्रिकेट या खेळातील एक चमचमतं नाव. क्रिकेट हा धर्म मानल्या जाणाऱ्या भारतातच मिताली राज वगळता फार कोणा महिला क्रिकेटपटूंची नावं भारतीयांना माहित नव्हती. मात्र दोन वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेमुळे भारतीय प्रेक्षकांना महिला क्रिकेटमधील अनेक नावं परिचित झाली. त्यापैकी एक म्हणजे मराठमोळी, मुंबईकर पूनम राऊत.
विश्वचषकाने भारताला हुलकावणी दिली असली, तरी भारतीयांची मनं जिंकली पूनम राऊतने. पूनमच्या संथ फलंदाजी आणि बचावतंत्राचा भारतीय संघाला फायदा झाला.
सचिन तेंडुलकर हे फक्त भारतीयच नव्हे, तर जगभरातील क्रीडा रसिकांचं दैवत. पूनमसाठी तो शिरसावंद्य नसता, तरच नवल. पूनमनेही साक्षात मास्टरब्लास्टरकडून धडे गिरवले, मात्र टीव्हीवर बघून.
30 वर्षांची पूनम मुंबईतील बोरिवली भागात लहानाची मोठी झाली. सर्वसामान्य मुंबईकरांप्रमाणे गल्लीत क्रिकेट खेळत तिचा श्रीगणेशा झाला. परंतु क्रिकेटची बॅट नसल्यामुळे तिच्या स्वप्नांना कधीच ब्रेक लागला नाही. कपडे धुण्याच्या धोक्याने तिनेक्रिकेट खेळायला सुरुवात केली. याच जिद्दीतून क्रिकेटमध्ये करिअर घडवण्याची मनिषा निर्माण झाली.
आधी भाऊ आणि मित्रांसोबत तीन-चार ओव्हर खेळणाऱ्या पूनमने समर कॅम्पमध्ये प्रवेश घेतला. ‘मुली क्रिकेट खेळतात का? आता ही मुलगी पोरांच्या सोबत पोरांसारखे कपडे घालून क्रिकेट खेळणार का?’ असे एक ना अनेक प्रश्न शेजाऱ्यांच्या मनात उभे राहिले. त्यातच शिवसेवा अकॅडमीत पाच वर्ष पूनमला मुलांसोबत क्रिकेट खेळण्यावाचून गत्यंतर नव्हतं. त्यामुळे पालकांचा पाठिंबा असला, तरी त्यांची काळजी रास्त होती.