जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टे़डीयम, रांची येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने आज 199 चेंडूत 150 धावा पूर्ण केल्या आहेत. याबरोबरच त्याने खास पराक्रम केला आहे.
रोहितने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेत खेळताना दुसऱ्यांदा 150 धावांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे तो एका कसोटी मालिकेत 2 वेळा 150 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारा 5 वा भारतीय सलामीवीर फलंदाज ठरला आहे.
याआधी असा पराक्रम विनु मंकड, सुनील गावस्कर, विरेंद्र सेहवाग आणि मुरली विजय यांनी केला आहे. विशेष म्हणजे गावस्करांनी दोन वेळा हा पराक्रम केला आहे.
रोहितने सध्या सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतूनच सलामीवीर म्हणून खेळायला सुरुवात केली आहे. त्याने या मालिकेतील पहिल्या सामन्यात पहिल्याच डावात 176 धावांची खेळी केली होती. तसेच याच सामन्यात त्याने दुसऱ्या डावात 127 धावा केल्या होत्या.
रोहितने सध्या सुरु असलेल्या रांची कसोटीत अजिंक्य रहाणेबरोबर चौथ्या विकेटसाठी 267 धावांची भागीदारीही केली आहे. रहाणे 115 धावांवर बाद झाला.