रांची : विराट कोहलीच्या टीम इंडियाने तिसऱ्या कसोटीतही दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवून, मालिका 3-0 ने खिशात टाकली. मंगळवारी रांची कसोटीत चौथ्या दिवशी भारताने आफ्रिकेचा एक डाव आणि 202 धावांनी मोठा पराभव केला आणि फ्रीडम ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं.
या कसोटीत टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने पहिल्या डावात 9 बाद 497 धावा केल्या होत्या. त्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचा पहिला डाव 162 धावांत आटोपला. त्यामुळे भारताला 335 धावांची आघाडी मिळाली होती. आफ्रिकेला फॉलोऑन टाळता न आल्याने त्यांना पुन्हा मैदानात उतरावं लागलं.
फॉलोऑन मिळाल्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरलेल्या आफ्रिकेचा गाशा अवघ्या 133 धावात गुंडाळला. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 3, शाहबाज नदीम आणि उमेश यादवने प्रत्येक 2 विकेट घेतल्या.
रोहित शर्माचं द्विशतक
दरम्यान, भारताकडून टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्माने डबल धमाका केला. रोहितने कसोटी कारकिर्दीतील पहिलं द्विशतक झळकावलं. रोहितने 255 चेंडूत 212 धावा ठोकल्या. याशिवाय अजिंक्य रहाणेने 115 धावा करुन त्याला उत्तम साथ दिली. त्यामुळे भारताला 497 धावांपर्यंत मजल मारता आली.
दरम्यान, रोहित शर्माने आपल्याला सलामीला संधी दिल्याबद्दल संघव्यवस्थापनाचे आभार मानले. नव्या चेंडूचा सामना कसा करायचा याबाबत अधिक अनुभव घेतला. नवी इनिंग सुरु करताना शिस्त अत्यंत महत्त्वाची असते याची नव्याने जाणीव झाली. नवा चेंडू एक भीती असते, पण त्याचा सकारात्मक सामना केला. नव्या चेंडूचा सामना करताना एक ठराविक वेळ खेळून काढला की आपलं निम्मं काम होतं. मी मनात ठरवलं होतं, मला मोठी खेळी करुन संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचवायचं आहे, असं रोहित शर्मा म्हणाला.