
नवी दिल्ली – भारत ‘क’ संघाने शुक्रवारी देवधर करंडक क्रिकेट स्पर्धेत कर्णधार शुभमन गिल (१४३) आणि मयांक अगरवाल (१२०) या दोन्ही सलामीवीरांनी साकारलेल्या शतकांना फिरकीपटू जलाज सक्सेनाच्या (७/४१) अप्रतिम गोलंदाजीची साथ लाभल्यामुळे भारत ‘अ’ संघाचा तब्बल २३२ धावांनी धुव्वा उडवला.
भारत ‘क’ संघाने या विजयासह अंतिम फेरी गाठली, तर भारत ‘अ’ संघाचे आव्हान सलग दोन पराभवांमुळे संपुष्टात आले. आता सोमवारी भारत ‘क’ विरुद्ध भारत ‘ब’ यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे.
शुभमन गिलने भारत ‘क’ संघाकडून दमदार शतक ठोकले. १४२ चेंडूत त्याने १४३ धावा केल्या. या खेळीत १० चौकार आणि ६ षटकार लगावले. याउलट भारत ‘अ’ च्या संपूर्ण संघाने मात्र १३४ धावा केल्या. त्यात एकूण ८ चौकार आणि ४ षटकार लगावले. देवधर करंडक स्पर्धेतील एका खेळाडूची वैयक्तिक धावसंख्या प्रतिस्पर्धी संघाच्या पूर्ण धावसंख्येपेक्षा जास्त धावा असण्याची ही पहिली वेळ होती. कोणालाही न जमलेला शुभमन गिलने हा पराक्रम केला.