क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते असं म्हटलं जातं. मुंबईची प्रतिष्ठित शालेय स्पर्धा हॅरिस शिल्डच्या पहिल्या बाद फेरीच्या सामन्यात एक अनोखी घटना घडली. या सामन्यात अंधेरीची चिल्ड्रन वेल्फेअर शाळा पराभूत झाली. मात्र या शाळेचा पराभव मोठ्या चर्चेचा विषय बनला आहे.
शालेय क्रिकेटमधील बलाढ्य संघ असलेल्या स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलने (एसव्हीआयएस) प्रतिष्ठेच्या हॅरिश शिल्ड आंतर शालेय क्रिकेट स्पर्धेत विक्रमी विजय मिळवताना अंधेरीच्या चिल्ड्रन्स वेल्फेअर संघाचा तब्बल ७५४ धावांनी पराभव केला.
या सामन्यात चिल्ड्रन्स वेल्फेअरच्या कोणत्याही फलंदाजाला धावांचे खाते उघडता आले नाही. प्रथम फलंदाजी करताना एसव्हीआयएसने ४५ षटकात ४ बाद ७६१ धावांचा डोंगर उभारला. मीत मयेकर याने १३४ चेंडूत ५६ चौकार आणि ७ षटकारांची आतषबाजी करताना नाबाद ३३८ धावांची खेळी केली.याशिवाय क्रिष्णा पार्ते (९५) आणि इशान रॉय (६७) यांनी फटकेबाजी करताना वेल्फेअर संघाला झोडून काढले.
प्रत्युत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेल्या वेल्फेअर संघाच्या एकाही फलंदाजा भोपळा फोडता आला नाही. एसव्हीआयएसच्या गोलंदाजांनी दिलेल्या ७ अवांतर धावांमुळे वेल्फेअर संघाच्या धावांचे खाते उघडले. भेदक गोलंदाजीपुढे वेल्फेअर संघाचा डाव केवळ ७ धावांत संपुष्टात आला आणि एसव्हीआयएस संघाने तब्बल ७५४ धावांनी विक्रमी विजयाची नोंद केली. अलोक पाल याने ३ धावांत ६, तर वरद वझे याने ३ धावांत २ बळी घेत वेल्फेअर संघाची दाणादाण उडवली.
विशेष म्हणजे एसव्हीआयएस शाळेतूनच भारताला हिटमॅन रोहित शर्मा लाभला. रोहितचे शालेय प्रशिक्षक दिनेश लाड यांच्याच मार्गदर्शनाखाली खेळताना एसव्हीआयएस संघाने विक्रमी विजय मिळवला.