इंग्लंडचा संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील पहिला कसोटी सामना यजमान न्यूझीलंडने जिंकून मालिकेची विजयी सुरुवात केली आहे. आता या मालिकेतील दुसरा कसोटी सामना शुक्रवारपासून(29 नोव्हेंबर) हॅमिल्टनला होणार आहे. पण या कसोटी सामन्यापूर्वीच न्यूझीलंडला दोन मोठे धक्के बसले आहेत.
या सामन्यातून न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि अष्टपैलू क्रिकेटपटू कोलिन डी ग्रँडहोम दुखापतीमुळे बाहेर पडले आहेत.
ग्रँडहोमने इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीत चांगली कामगिरी करताना 65 धावांची खेळी केली होती. तसेच गोलंदाजीत दोन्ही डावात मिळून 3 गडी बाद केले होते. पण त्याला स्नायूंच्या दुखापतीचा त्रास होत असल्याने दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडावे लागले आहे.
दुसरीकडे बोल्टला पहिल्या सामन्याच्या शेवटच्या दिवशी दुखापत झाली. त्याच्या उजव्या बाजूच्या बरगडीत वेदना झाल्याने ट्रेंट बोल्टला पहिला कसोटी सामना सुरु असताना मैदान सोडावे लागले होते.