वेस्ट इंडीजचा कर्णधार कायरन पोलार्डने आपल्या संघाला भारताविरूद्ध ‘अंडरडॉग’ म्हटले आहे. तसेच त्याने सांगितले की शुक्रवारपासून भारताविरुद्ध सुरू होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेत अनुकूल निकाल मिळवण्यासाठी वेस्ट इंडिज संघ मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित करेल.
ईएसपीएनक्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार, पोलार्ड म्हणाला की, “आमचा सामना मजबूत प्रतिस्पर्ध्यांशी आहे. आम्ही ‘अंडरडाॅग’ असू आणि ते बरोबर आहे. पण सर्व आपल्या प्रतिभेवर विश्वास ठेवून रणनीतीची योग्य अंबलबजावणी या गोष्टींची निगडीत आहे.”
“तसेच जेव्हा आपण असे करतो तेव्हा काहीही शक्य असते. अशी काही विभागांमध्ये सुधारणा आवश्यक आहेत. जेव्हा आपण असे करतो तेव्हा बहुतेक वेळा आपल्याला अनुकूल परिणाम मिळतात,” असेही पोलार्ड म्हणाला.
वेस्ट इंडीजचा 3 टी20 सामन्यांच्या मालिकेसह भारत दौरा सुरू होईल. यातील पहिला टी20 सामना 6 डिसेंबरला हैदराबादमध्ये (Hyderabad) होणार आहे. मालिकेचा दुसरा सामना 8 डिसेंबर रोजी तिरुवनंतपुरम येथे खेळला जाईल. तर, 11 डिसेंबर रोजी मालिकेचा तिसरा सामना मुंबईत होईल. यानंतर 3 वनडे सामने खेळले जातील.
या वनडे मालिकेतील पहिला सामना 15 डिसेंबर रोजी चेन्नई येथे खेळवला जाईल. विशाखापट्टणम येथे 18 डिसेंबर रोजी दुसरा वनडे सामना आणि 22 डिसेंबर रोजी कटक येथे वनडे मालिकेतील शेवटचा सामना खेळला जाईल. अलीकडेच वनडे मालिकेत वेस्ट इंडीज संघाने अफगाणिस्तानचा पराभव केला आहे. त्याबद्दल विंडीजचा कर्णधार पोलार्ड म्हणाला की, संघाच्या कामगिरीमध्ये सातत्य राखण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू.
“आमच्या खेळाडूंनी अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेत उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. यामुळे आम्हाला भविष्यातही चांगले काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे.,” असेही पोलार्ड यावेळी म्हणाला. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात आत्तापर्यंत झालेल्या 14 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी भारताने 8 सामने जिंकले आहेत. तर, वेस्ट इंडीज संघाने 5 सामने जिंकले आहेत. यातील एका सामन्याचा निकाल लागला नाही.