
बीसीसीआयचा नवनियुक्त अध्यक्ष आणि भारतीय संघाचा माजी कप्तान सौरव गांगुली याने महिला आयपीएल टीम साठीची तयारी सुरु असल्याचे आणि चार वर्षात सात महिला टीम या स्पर्धेत खेळू शकतील अश्या प्रकारे खेळाडू तयार करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले. अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यावर गांगुलीने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. पहिली डे नाईट टेस्ट याचे उदाहरण म्हणता येईल.
महिला आयपीएल स्पर्धा संबंधी बोलताना तो म्हणाला गेली काही वर्षे यावर विचार सुरु आहे. त्यानुसार दोन टीम मध्ये टी २० चॅलेंज स्पर्धा २०१८ मध्ये घेतली गेली तर हीच स्पर्धा २०१९ मध्ये तीन टीम मध्ये झाली. त्याला क्रिकेटप्रेमींकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. विदेशी खेळाडू त्यात सहभागी होत आहेत. प्रेक्षकांकडून महिला आयपीएलची मागणी होत आहे पण त्यासाठी खूप तयारी करायला हवी.
सात महीला टीम मध्ये ही स्पर्धा खेळवायची असेल तर किमान १५० ते १६० खेळाडू हव्यात. सध्या ही संख्या ५० ते ६० इतकीच आहे. त्यासाठी प्रथम राज्य असोसिएशन अधिक मजबूत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातून खेळाडू तयार होतील. त्याची सुरवात झाली आहे मात्र त्यासाठी किमान तीन वर्षे हवीत. दरम्यान आयपीएल साठी संघ तयारी पूर्ण होईपर्यंत टी २० स्पर्धा चार टीम मध्ये घेण्याचा विचार सुरु आहे.