मर्यादित षटकांच्या क्रिकेटकडे अधिक लक्ष द्यावे लागेल आणि भारतीय संघात स्थान मिळवण्याचा आयपीएल (IPL) हा एक सोपा मार्ग आहे. हे आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळातच समजले होते, असे भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरने मंगळवारी (17 डिसेंबर) सांगितले आहे.

 

राजस्थानच्या रणजी ट्राॅफीतील (Ranji Trophy) क्रिकेट सामन्यात हैदराबादविरुद्ध (Hyderabad) चाहरने 10 धावांत 8 विकेट्स घेतले होते. परंतु, कसोटीत 125 किलोमीटरच्या वेगाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याचे स्वप्न पूर्ण केले जाऊ शकत नाही, हे त्याला लवकरच समजले असल्याचे त्याने स्पष्ट केले.

 

“वेग वाढवण्यासाठी जेव्हा मी माझी शैली बदलली तेव्हा मला माझ्या राज्याच्या संघात संघर्ष करावा लागला. मला अचानक असं वाटलं की भारतीय संघात स्थान मिळवणं मला खूप कठीण जाईल,” असे पीटीआयशी बोलताना चाहर म्हणाला. “जर माझा रणजीवर विश्वास असेल तर मला बरेच सामने खेळावे लागले असते. संपूर्ण हंगाम खेळावा लागेल आणि दुलीप ट्रॉफीमध्येही  खेळावं लागेल. हा खूप लांबचा मार्ग होता,” असेही चाहर म्हणाला.

 

“परंतु, जर तुम्ही आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली तर तुम्हाला लवकरच भारताकडून खेळण्याची संधी मिळू शकते. माझ्या कारकीर्दीच्या त्या टप्प्यावर, मी मर्यादीत षटकांच्या क्रिकेटवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला,” असे वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसर्‍या वनडे सामन्याआधी चाहर म्हणाला.

 

चाहरने आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्जबरोबर दोन हंगाम खेळल्यानंतर भारतीय संघात स्थान मिळवले. चाहर आपल्या कमकुवतपणाबद्दल बोलला आहे आणि त्यांना सुधारण्यासाठी आपल्याला काय करण्याची आवश्यकता आहे हेही त्याला माहित आहे, असेही त्याने सांगितले.

 

“जेव्हा मी रणजी ट्राॅफीत प्रवेश केला, तेव्हा मी 125 किमी वेगाने गोलंदाजी करायचो. माझा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात मी जखमीही झालो. मला माहित आहे की या वेगाने मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुढे जाऊ शकत नाही. मला ते 140 पर्यंत वाढवावे लागेल आणि त्यामध्ये स्विंग जोडावे लागेल,” असे चाहर म्हणाला.

 

“135 ते 137 किमी पर्यंत स्विंग घेणारा चेंडू कोणत्याही फलंदाजासाठी खूप कठीण असतो. खेळपट्टी सपाट असेल तर 150 किमीचा चेंडूही सहज खेळता येऊ शकतो,” असेही चाहर म्हणाला. चाहर आता चांगला मर्यादीत षटकांच्या क्रिकेटचा गोलंदाज बनण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.

 

Find out more: