
मुंबई : यंदाच्या वर्षातील कामगिरीच्या निकषावर आयसीसीने एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांच्या विश्व एकादश संघाची निवड केली आहे. आयसीसीच्या दोन्ही संघांत सांगलीच्या स्मृती मनधानाने स्थान मिळवले आहे. हा मान मिळवणारी ती एकमेव भारतीय महिला क्रिकेटर ठरली.
आयसीसीच्या एकदिवसीय संघात स्मृती मनधानाच्या साथीने झुलान गोस्वामी, शिखा पांडे आणि पूनम यादवचा समावेश करण्यात आला आहे. तसेच आयसीसीच्या टी-20 संघात स्मृती मनधानासह दीप्ती शर्मा आणि राधा यादव यांची निवड करण्यात आली आहे.
यंदाचे वर्ष भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीची फलंदाज स्मृति मनधानाने गाजवले. 23 वर्षांच्या स्मृतिने 51 एकदिवसीय, 66 टी-20 आणि काही कसोटी सामने खेळले आहेत. तिने टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण 3476 धावा केल्या आहेत. स्मृती मनधानाला गेल्या वर्षीही सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू हा बहुमान मिळाला होता.
सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू म्हणून ऑस्ट्रेलियाच्या एलिस पेरी हिच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. एलिस पेरी हिला सर्वोत्तम एकदिवसीय महिला क्रिकेटपटूही घोषत करण्यात आले. आयसीसी महिला एकदिवसीय आणि टी-20 संघाचे कर्णधारपद ऑस्ट्रेलियाची खेळाडू मेग लेनिंगला दिले आहे. तसेच तिचा वर्षभराच्या महिला एकदिवसीय संघामध्येही समावेश करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त थायलंडच्या चनिंदा सुथीरुआंगला आयसीसी इमर्जिग प्लेयर ऑफ द ईयर म्हणून निवडण्यात आले आहे.
आयसीसी महिला एकदिवसीय संघ : एलिसा हॅली (विकेटकीपर), स्मृति मंधाना, तमसीन ब्यूमाँट, मेग लॅनिंग (कर्णधार), स्टेफनी टेलर, एलिस पॅरी, जेस जोनासेन, शिखा पांड, झूलन गोस्वामी, मेगन शट्ट, पूनम यादव. आयसीसी महिला टी-20 संघ : एलिसा हॅली (विकेटकीपर), डेनिएल व्याट, मेग लेनिंग (कर्णधार), स्मृति मंधाना, लिजेल ली, एलिस पॅरी, दीप्ति शर्मा, निदा दार, मेगन शट्ट, शबनम इस्माइल, राधा यादव.