इस्लामाबाद – फक्त हिंदू असल्या कारणाने दानिश कनेरिया याला संघातील इतर खेळाडूंकडून वाईट वागणूक दिली जात असल्याचा गौप्यस्फोट पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने केला होता. आता खुद्द दानिशने शोएब अख्तरने केलेल्या या दाव्यावर खुलासा केला असून हे सर्व सत्य असून आपल्यासोबत पाकिस्तान संघात भेदभाव करण्यात आल्याचे त्याने म्हटले आहे. हा खुलासा शोएब अख्तरने केल्याबद्दल त्याचे दानिशने आभार मानले असून त्याने सांगितलेली प्रत्येक गोष्ट खरी असल्याला दुजोरा दिला आहे.
एका चॅट शोमध्ये बोलताना शोएब अख्तरने हिंदू असल्याने इतर पाकिस्तानी खेळाडू दानिश कनेरियाला योग्य वागणूक देत नसल्याचा खुलासा केला होता. दानिश पाकिस्तानी संघात कसोटी सामन्यात सर्वात जास्त विकेट्स घेण्याच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. तर पाकिस्तानी क्रिकेट संघात स्थान मिळवणारा दुसरा हिंदू धर्मीय खेळाडू आहे. याआधी अनिल दलपत पाकिस्तानी संघाकडून खेळले आहेत.
या विषयावर शोएब अख्तरने भाष्य केल्याने आपल्याला आता धैर्य मिळाले असून त्या सर्व खेळाडूंची ज्यांनी आपल्याला अपमानास्पद वागणूक दिली त्यांची नावे लवकरच जाहीर करणार असल्याचे दानिशने जाहीर केले आहे. त्याने यावेळी एकीकडे संघात काही खेळाडू दुजाभाव करत असताना युनिस खान, इंजमाम, मोहम्मद युसूफ, शोएब अख्तर यांच्यासारखे खेळाडू आपल्या धर्माची चिंता न करता चांगली वागणूक द्यायचे असेही म्हटले आहे.