महाराष्ट्राच्या २१ वर्षांखालील संघाने तिस-या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यांनी उत्तर प्रदेशाचे आव्हान ३८-२० असे सहज संपुष्टात आणले. अन्य एका उपांत्य लढतीत महाराष्ट्राच्या १७ वर्षांखालील मुलांना मात्र स्पर्धेत वर्चस्व राखल्यानंतरही अखेरीस राजस्थानकडून ५१-५५ असा पराभव पत्करावा लागला.

 

लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक संस्थेच्या संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत रविवारी महाराष्ट्राच्या युवकांनी आपल्या जबरदस्त खेळाचे प्रदर्शन कायम ठेवले. पंकज मोहितेचा व्यावसायिक अनुभव, अस्लम इनामदारच्या आक्रमक चढाया आणि सौरभ पाटिलचे नेतृत्वाला बचावाची मिळालेली भक्कम तटबंदी महाराष्ट्राच्या वर्चस्वाचे वैशिष्ट्य ठरले.

 

पहिल्या चढाईपासून अस्लमला लय गवसली. त्यानंतर संपूर्ण सामन्यात त्याने आपल्या भोवती सामना फिरवला. डू ऑर डाय चढाईत त्याने राखलेले सातत्य कमालीचे होते. खोलवर चढाया करताना पंकजने मिळविलेले बोनस महाराष्ट्राचे गुण वाढवत होते. या सगळ्या वाटचालीत सौरभ कर्णधार या जबाबदारीत सहका-यांना एक ठेवत होता. या सगळ्यांवर शुभम शिंदे, राजू काथोरे, अजित पाटिल आणि वैभव गरजे यांची बचावाची भिंत अखेर पर्यंत भक्कम राहिली. त्यामुळेच मध्यंतराच्या २२-९ अशा मोठ्या आघाडीनंतर महाराष्ट्राच्या युवकांचा ३८-२० असा मोठा विजय साकार झाला.

 

महाराष्ट्राच्या १७ वर्षांखालील संघाला मात्र अतिआत्मिवश्वास महागात पडला. मध्यंतराला २१-१३ अशा आघाडीनंतर महाराष्ट्राला सामना खेळता आला नाही. अखेरच्या तीन मिनिटात चढाई, बचाव असे सगळे सुरळीत चालू असताना ३८-३३ ही आघाडी महाराष्ट्राला राखता आली नाही. आधुनिक थर्ड रेडच्या नियमाचा त्यांना वापर करता आला नाही आणि त्यांनी सामना निष्कारण ४४-४४ असा बरोबरीत सोडवला.

 

त्यानंतरच्या तीन मिनिटांच्या टायब्रेकरमध्येही ४९-४७ ही आघाडी टिकविता आली नाही. त्या वेळी शुभमला बोनस गुण घेतल्यावर मागे फिरणे जमले नाही. त्याने टच पॉईंट घेण्याच्या नादात आपला बळी दिला आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या हातातील सामना राजस्थानकडे झुकला. त्यांनी ही संधीचा उपयोग घेत टायब्रेकरमध्ये बाजी मारली.

 

सुवर्णपदकासाठी महाराष्ट्रासमोर हरियाणाचे आव्हान

महाराष्ट्राच्या युवकांसमोर आता सुवर्णपदकासाठी हरियाणाचे आव्हान असेल. त्यांनी देखील रंगतदार झालेल्या सामन्यात चंडिगडचे आव्हान ३९-३९ अशा बरोबरीनंतर टायब्रेकरमध्ये ४४-४२ असे मोडून काढले.

Find out more: