ऑस्ट्रेलियातील आगपिडीतांच्या मदतीसाठी जगभरातील स्टार टेनिस खेळाडू पुढे आले असून त्यांनी प्रदर्शनी सामन्यात खेळून जमा झालेली ३१ कोटींची रक्कम आग फंडासाठी देण्याची घोषणा केली. या प्रदर्शनी सामन्यात नंबर वन खेळाडू राफेल नदाल, नोवाक जोकोविच, रॉजर फेडरर, सेरेना विल्यम्स, वोज्नियाकी यांच्यासह अनेक खेळाडूंचा समावेश होता. यापूर्वीही या खेळाडूंनी ९ कोटी रुपये याच कामासाठी दान केले आहेत.
या सिझनमधल्या सर्व सामन्यात जेवढ्या एस सर्व्हिस केल्या गेल्या त्या प्रत्येक सर्व्हिससाठी १० हजार रुपये या प्रमाणात जमलेले ८.५० कोटी रुपये आगपिडीतांसाठी दिले गेले आहेत. त्यात ऑस्ट्रेलियन टेनिस स्टार निक किर्गीयोस सह अन्य खेळाडूंचा समावेश होता. एस ही अतिवेगवान स्पिन सर्व्हिस असते आणि त्यात अनेकदा समोरच्या खेळाडूला जागेवरून हलण्याची संधीही मिळत नाही. या सर्व्हिसवर खेळाडूला थेट पॉइंट मिळतो.
ऑस्ट्रेलियात गेले पाच महिने तीन राज्यातील १ कोटी ७९ लाख एकर जंगलात आगीचा वणवा पेटला असून त्यात आत्तापर्यंत २५ जणांचे जीव गेले आहेत तर ४८ कोटीपेक्षा जास्त प्राणी, पक्षी, किडे, सरपटणारे प्राणी जळून गेले आहेत असे समजते.