उद्यापासून(24 जानेवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात 5 सामन्यांची टी20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ व्यवस्थापन केएल राहुलला यष्टीरक्षक म्हणून कायम करणार असल्याचे भारताचा कर्णधार विराट कोहलीने सुचवले आहे.
न्यूझीलंड विरुद्ध टी20 मालिका खेळण्याआधी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे मालिका खेळला आहे. या वनडे मालिकेत राहुलने भारताचा नियमित यष्टीरक्षक रिषभ पंतच्या अनुपस्थितीत यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळताना चांगली कामगिरी केली होती.
याबद्दल गुरुवारी(23 जानेवारी) न्यूझीलंड विरुद्धच्या टी20 मालिकेच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेमध्ये विराट म्हणाला, ‘केएल राहुलने यष्टीरक्षक करताना चांगली कामगिरी केली आहे. तसेच एक अशी चांगली परिस्थिती निर्माण केली आहे की ज्यामुळे आम्हाला संघात अधिक चांगले संतुलन राखता येईल. ही अशी गोष्ट आहे जी आम्ही पुढील काही कालावधीसाठी कायम करु.’
विराट पुढे म्हणाला, ‘मला माहित आहे बाहेर चर्चा चालू आहेत की या खेळाडूला काय झाले, हे असे का नाही केले. पण आमच्यासाठी संघाला कशाची गरज आहे आणि एक संघ म्हणून आम्ही संतुलन कसे राखू हे पहाणे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.’
पंत मागील अनेक दिवसांपासून खराब कामगिरीमुळे टीकेचे लक्ष्य ठरतो आहे. आता तर त्याच्यासमोर मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताच्या अंतिम 11 जणांच्या संघातून बाहेर जाण्याचे संकटही उभे राहिले आहे. त्यामुळे आता त्याला उद्याच्या सामन्यात संधी मिळणार का की राहुलला भारतीय संघ यष्टीरक्षक म्हणून कायम करणार हे पहावे लागणार आहे.