आजपासून(14 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात तीन दिवसीय सराव सामन्याला सुरुवात झाली आहे. या सराव सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत असून पहिल्या दिवसाखेर भारताच्या सर्वबाद 263 धावा झाल्या आहेत.

भारताकडून हनुमा विहारीने शतकी खेळी केली आहे. त्याने सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत 182 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकारांसह 101 धावा केल्या. त्याचे हे शतक पूर्ण झाल्यानंतर तो रिटायर्ट हर्ट होऊन ड्रेसिंग रुममध्ये परतला. त्याच्याबरोबरच चेतेश्वर पुजाराने आज 93 धावांची शानदार अर्धशतकी खेळी केली. त्याने 211 चेंडूत 11 चौकार आणि 1 षटकारांसह ही 93 धावांची खेळी केली.

 

या दोघांव्यतिरिक्त मात्र अन्य कोणत्याही भारतीय फलंदाजाला आज खास कामगिरी करता आली नाही. आज भारताकडून सलामीला फलंदाजीला आलेले मयंक अगरवाल आणि पृथ्वी शॉने स्कॉट कुग्लेइजेनच्या गोलंदाजीवर सुरुवातीलाच विकेट गमावल्या. शॉ शून्य धावेवर तर अगरवाल 1 धाव करुन झेलबाद झाले. अगरवाल बाद झाल्यानंतर लगेचच पुढच्याच चेंडूवर शुबमन गिलही शून्यावर बाद झाला. त्यामुळे भारताची अवस्था 5 धावा 3 विकेट्स अशी झाली होती.

 

यानंतर भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने पुजारासह डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण रहाणेही 18 धावा करुन बाद झाला. अखेर पुजारा आणि विहारीने भारताचा डाव सावरत 200 धावांचा टप्पा पार करुन दिला. मात्र या दोघांनंतरही भारताची फलंदाजी कोलमडली. रिषभ पंत 7 धावांवर, वृद्धिमान सहा आणि आर अश्विन शून्यावर, तर रविंद्र जडेजा 8 धावांवर बाद झाला. न्यूझीलंड एकादश संघाकडून कुग्लेइजेन आणि इश सोधीने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर जॅक गिब्सनने 2 विकेट्स आणि जेम्स निशमने 1 विकेट घेतली.

Find out more: