टेनिस जगतात सौंदर्यवती म्हणून प्रसिद्ध असलेली रशियाची टेनिस खेळाडू मारिया शारापोवा हिने टेनिस मधून निवृत्ती जाहीर केली आहे. ३२ वर्षीय मारिया ५ ग्रँडस्लॅम विजेती आहे मात्र गेले अनेक दिवस ती खांद्याच्या दुखापतीमुळे त्रस्त असून अनेक उपचार घेऊनही हे दुखणे बरे झालेले नाही त्यामुळे तिने टेनिस ला रामराम करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

 

मारियाने तिच्या टेनिस कारकीर्दीत एखाद्या चँपियनला जे चढउतार पहावे लागतात त्याचा पुरेपूर अनुभव घेतला आहे. रशियात जन्मलेल्या शारापोवाने वयाच्या ४ थ्या वर्षी टेनिस खेळायला सुरवात केली होती. नंतर तिचे कुटुंब अमेरिकेत आले तेव्हा तिला टेनिसचे परिपूर्ण प्रशिक्षण मिळू शकले. २००४ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी तिने प्रतिष्ठित विंबल्डन स्पर्धेत सेरेना विलियम्सला हरवून विजेतेपद मिळविले होते. त्यापाठोपाठ २००६ मध्ये युएस ओपन जिंकून दुसरे ग्रँडस्लॅम मिळविले होते. २०१२ मध्ये फ्रेंच ओपन जिंकून तिने ग्रँडस्लॅम पूर्ण केले होते.

 

 

मात्र २०१६ मध्ये ती डोपिंग प्रकरणी दोषी ठरली तेव्हा तिच्यावर दोन वर्षाची बंदी घातली गेली होती ती नंतर १५ महिने करण्यात आली. यावेळी नायके, पोर्शे सारख्या अनेक कंपन्यांनी तिच्या बरोबरचा करार संपुष्टात आणल्याने तिचे १६५ कोटींचे नुकसान झाले होते. शानदार खेळ आणि सौंदर्य यामुळे टेनिस जगतात ती नेहमीच चर्चेत राहिली. तिला भारताविषयी प्रेम आहे त्यामुळे तिने मानेवर हिंदी भाषेत ‘जीत ‘ असा टॅट्यू रेखला आहे.

 

मारिया गेली दोन वर्षे अलेक्झांडर गील्केस याच्याबरोबर डेटिंग करते आहे. अलेक्झांडर लंडन मधील उद्योगपती असून पॅडल ८ फर्मचा संस्थापक आहे. ही ऑनलाईन लिलाव करणारी वेबसाईट असून तेथे दुर्मिळ आणि अँटीक वस्तूंचे लिलाव केले जातात.

Find out more: