नवी दिल्ली – डी. वाय. पाटील टी-२० स्पर्धेत टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने ‘जादुई’ फॉर्म कायम राखला असून पांड्याने या स्पर्धेत सलग दुसरे शतक ठोकले. त्याचबरोबर हे शतक झळकवताना त्याने २० उत्तुंग षटकार लगावत सर्वांनाच आश्चर्यचकित करून सोडले आहे.
बीपीसीएल संघाविरूद्ध रिलायन्स-१ संघाकडून खेळणार्या हार्दिकने ५५ चेंडूंमध्ये ६ चौकार आणि २० षटकारांच्या मदतीने १५८ धावांची नाबाद खेळी खेळली. एका षटकात त्याने सलग तीन षटकार लगावत आपल्या आक्रमक शैलीचे दर्शन घडवले. या शानदार खेळीत हार्दिकचा स्ट्राईकरेट २८७.२७ असा होता.
मुंबईत खेळल्या जाणाऱ्या १६ व्या डीवाय पाटील टी-२० स्पर्धेमध्ये हार्दिकने आतापर्यंत चार सामने खेळले असून त्यात दोन शतकांचा समावेश आहे. त्याने बँक ऑफ बडोदाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात २५ चेंडूत ३८ धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याने ३९ चेंडूत शतक ठोकत १०५ धावांची खेळी केली होती. या डावात त्याने १४ षटकार लगावले होते.