मुंबई – जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून जवळपास ४ हजार लोकांना या व्हायरसमुळे आपला प्राण गमवावा लागला आहे. या व्हायरसचा जगभरातील १०० हून अधिक देशात फैलाव झाला असून बुधवारपर्यंत भारतात कोरोनाचे ६१ रुग्ण आढळल्यामुळे आगामी इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धा (आयपीएल) होणार की नाही यावर साशंकता आहे. पण ही स्पर्धा रद्द करण्यात यावी, यासाठी आता मद्रास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
याबाबत जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अधिकृत्त संकेतस्थळावरील माहितीनुसार कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारच्या औषधाचा शोध लागलेला नाही. झपाट्याने कोरोनाचा प्रसार होत आहे. केंद्र सरकारने यामुळे बीसीसीआयला आयपीएलचे सामने खेळवण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी बेंझीगर यांनी आपल्या याचिकेत केली आहे. बेंझीगगर यांनी आपल्या याचिकेत इटली फुटबॉल फेडरेशन लीगने देशात होणारे सर्व सामने रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचेही म्हटले आहे.
दरम्यान, गुरुवारी म्हणजेच १२ मार्चला न्यायाधीश एमएम सुरेंद्र आणि कृष्णन रामास्वामी यांच्या खंडपीठासमोर बेंझीगर यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. याआधी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आयपीएल पुढे ढकलण्यासंदर्भात बोलणी सुरू असल्याचे म्हटले आहे. तर कर्नाटकनेही आयपीएल स्पर्धा पुढे ढकला अन्यथा रद्द करा, अशी मागणी केंद्राकडे पत्राद्वारे केली आहे.