कोरोना व्हायरसमुळे मार्च महिन्यापासून सुरु झालेल्या २१ दिवसांच्या लाॅकडाऊनमुळे आयपीएल १५ एप्रिल पर्यंत स्थगित करण्यात आली होती. आज झालेल्या निर्णयानुसार ही स्पर्धा आता अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.
याबद्दलचे वृत्त एएनआयने दिले आहे. २०२० हे आयपीएलचे १३वे पर्व होते. दिनांक १४ एप्रिल २०२० रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात दुसऱ्यांदा लाॅकडाऊनची मुदत वाढवली आहे. हे लाॅकडाऊन ३ मे पर्यंत चालणार आहे. त्यानंतर देशात कोणती परिस्थिती असेल याचा काहीही अंदाज नाही.
याचमुळे आयपीएल १३चे पर्व हे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयने सर्व फ्रंचाईजींना याची माहिती दिली आहे की आयपीएल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.
“आम्हाला बीसीसीआयकडून आयपीएल अनिश्चित काळासाठी रद्द केल्याची माहिती देण्यात आली आहे. परंतु ते यातून सर्व गोष्टी ठिक झाल्यावर नक्कीच मार्ग काढतील, ” असे एका फ्रचांईजीचा अधिकारी पीटीआयला नाव न सांगण्याच्या अटीवर म्हणला.