अत्याधुनिक तंत्रज्ञान अगदी कमी किंमतीत आणणाऱ्या Xiaomi ने नुकतेच 48 मेगापिक्सलच्या सेन्सरचे परवडणारे फोन 11 हजारापासून आणले आहेत. याच कॅमेऱ्याचा फोन नुकत्याच लाँच झालेल्या मोटरोलाच्या 20 हजार ते वनप्लसच्या 33-50 हजाराच्या आसपास मिळतो आहे. आता 5 जी तंत्रज्ञान भारतात येऊ घातलेले आहे. अशातच रेडमीने पुन्हा किंमत युद्धामध्ये बाजी मारण्याची तयारी केली आहे.
सध्या बाजारात 5 जी चा वनप्लस, सॅमसंगचा मोबाईल उपलब्ध आहे. मात्र, या मोबाईलची किंमतच 50 हजारांपासून 80 हजारांपर्यंत आहे. 5 जी तंत्रज्ञान नवीन असल्याने एवढ्या किंमती असल्या तरीही प्रोसेसरची किंमत पाहता ती काही 30 हजारांच्या खाली येण्याची चिन्हे नाहीत.
यामुळे शाओमीने नेहमीप्रमाणे परवडणाऱ्या किंमतीत मोबाईल उपलब्ध करणाऱ्या उपकंपनी रेडमीद्वारे हे आव्हान पेलण्याचे ठरविले आहे. भारतात 2020 च्या सुरूवातीला 5 जी उपलब्ध होईल. यामुळे भारतीय बाजारपेठ काबिज करणाऱ्या शाओमीने रेडमीचा 5 जी फोन केवळ 20 हजारात आणण्याचे ठरविले आहे.
जागतिक बाजारात मागणी असलेल्यांपैकी 5 जीच्या फोनची मागणी जोर धरत आहे. 2023 पर्यंत जवळपास 51 टक्के एवढा वाटा होणार आहे. सॅमसंग, हुवाई, वनप्लससह शाओमीचेही फोन आहेत. मात्र हे प्रिमिअय श्रेणीमध्ये येतात. अद्याप हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्याच देशांमध्ये 5 जी सुरू झाले आहे.
दरम्यान, सॅमसंगच्या दाव्यानुसार कंपनीने नुकत्याच लाँच केलेल्या Galaxy S10 चे दक्षिण कोरियामध्ये 10 लाख फोन विकले आहेत. भारतात 2022 पर्यंत 5जी सेवा सुरू होण्याची शक्यता नाही. यामुळे तोपर्यंत कमी किंमतीत मोबाईल उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
रेडमीला आणखी एका कंपनीचे आव्हान मिळणार आहे. ओप्पोने शाओमीला आव्हान दिले आहे. आता ओप्पोची उपकंपनी रिअलमीनेही 5 जी फोन लाँच करण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, याची वेळ सांगितलेली नाही. पण किंमतीच्या बाबतीत रेडमीला टक्कर मिळण्याची शक्यता आहे.