चांद्रयान दोन मोहिमेत फक्त दोन किलोमीटर अंतर राहिले असताना लँडर विक्रमशी संपर्क तुटला होता. लँडर विक्रम सापडले असल्याचे रविवारी इस्त्रोने स्पष्ट केले होते. आता ‘इस्रो’ने आणखी एक आनंदाची बातमी दिली असून विक्रम लँडर सुरक्षित असल्याचे सांगितले आहे.
चंद्रावर लँडर उतरवताना हार्ड लँडिंग झाले असण्याची शक्यता आहे. ऑर्बिटरने पाठवलेल्या फोटोवरून लँडर पूर्णपणे सुरक्षित असल्याचे समोर आले आहे. लँडरचे तुकडे होण्याची भीती व्यक्त केली जात होती; मात्र तसे काही झालेली नाही. विक्रमशी संपर्क साधण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे ‘इस्रो’ने म्हटले आहे.
‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांना अपेक्षित असे यश या मोहिमेला मिळाले नसले, तरी ही मोहीम अयशस्वी ठरली असे म्हणता येणार नाही. ‘इस्रो’च्या सर्व संशोधकांनी केलेली मेहनत वाया गेलेली नाही. संपर्क तुटला असला, तरी चांद्रयान मोहीम पुढचे एक वर्ष सुरू राहणार आहे. चांद्रयान दोन चे लँडर आणि रोव्हरशी संपर्क तुटला आहे; पण चंद्राच्या कक्षेत चांद्रयान दोनचे ऑर्बिटर त्याचे काम करत आहे. ऑर्बिटरच्या माध्यमातून फोटो ‘इस्रो’ला मिळत राहतील.
शास्त्रज्ञांनी सांगितले होते, की लँडरशी संपर्क तुटल्याने मोहिमेला पाच टक्के इतकाच धक्का बसला आहे. 95 टक्के काम सुरू राहणार आहे. पाच टक्क्यांमध्ये लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान यांच्याशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे चंद्राच्या पृष्ठभूमीची माहिती मिळणार नाही; मात्र ऑर्बिटरच्या सहाय्याने इतर माहिती मिळत राहणार आहे. चांद्रयान 2 चा ऑर्बिटर चंद्राभोवती फिरत राहणार आहे.
ज्या रोव्हरचा संपर्क तुटला आहे, तो चंद्राच्या भूमीवर उतरल्यानंतर फक्त 14 दिवस काम करू शकतो. ऑर्बिटर मात्र एक वर्षभर काम करत राहणार आहे. ऑर्बिटर चंद्राचे अनेक फोटो काढून ‘इस्रो’ला पाठवणार आहे. ऑर्बिटरकडून लँडरची माहिती सुद्धा मिळवता येईल. ऑर्बिटरने लँडर विक्रमचे फोटो पाठवल्यानंतर त्याचे विश्लेषण केल्यानंतर नेमके कारण समजू शकेल.
5 PM