
टिकटॉक हा एक छोटा व्हिडिओ प्लॅटफॉर्म आहे आणि जगभरात तो लोकप्रिय अॅप बनला आहे. या अॅपशी स्पर्धा करण्यासाठी प्ले स्टोअरवर सध्या बरीच अॅप्स आहेत. मात्र काळानुसार टिकटॉकची लोकप्रियता वेगाने वाढत आहे. या अॅपचा एकट्या भारतात बराच मोठा यूजर बेस आहे.
आता या अॅपशी स्पर्धा करण्यासाठी इन्स्टाग्राम एक नवीन अॅप घेऊन आला आहे. रील्स (Reels) नावाचा हा प्लॅटफॉर्म टिकटॉक या संकल्पनेवर आधारित असणर आहे. रील्स सध्या फक्त ब्राझीलमध्ये उपलब्ध आहे. या देशात टिकटॉकची लोकप्रियता फार कमी आहे, त्यामुळे कंपनीने रील्सला पहिल्यांदा तिथे सादर केले.
इंडिया टूडेच्या एका अहवालात म्हटले आहे की, रील्समध्ये देखील युजर्स टिकटॉकसारखे 15 सेकंदातील शॉर्ट व्हिडिओ क्लिप बनवू शकतात. याव्यतिरिक्त यामध्ये बरीच गाणी आणि व्हिडीओ लायब्ररी आहे, ज्यामुळे युझर्स लिप-सिंक व्हिडिओ देखील बनवू शकतील.
रील्सचा उपयोग वापरकर्ते इंस्टाग्राम कॅमेराच्या माध्यमातून करू शकतील. याचा एक डेडिकेटेड फीडदेखील असणार आहे, ज्याद्वारे वापरकर्ते एकमेकांचे व्हिडीओ पाहू शकतील. भारतात टिकटॉक सेवेची लोकप्रियता खूप जास्त आहे, अशा परिस्थितीत कंपनीला येथे ही नवीन सेवा स्थापित करणे थोडे अवघड जाईल.
दरम्यान, इन्स्टाग्राम आपल्या वापरकर्त्यांसाठी वेळोवेळी नवीन वैशिष्ट्ये घेऊन येत असतो. यावर्षी जूनमध्ये, इन्स्टाग्रामने 'ऑप्ट-इन' फीचर सादर केले. यामुळे वापरकर्त्यांचा इंटरनेट डेटाचा वापर कमी होणार आहे. फेसबुकच्या मालकीच्या इन्स्टाग्रामने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ज्या ठिकाणी मोबाइल इंटरनेट डेटा योजना मर्यादित आहे किंवा अतिशय धीम्या गतीने जिथे इंटरनेट चालते अशी बाजारपेठ ध्यानात घेऊन हे खास फिचर तयार करण्यात आले आहे.