
चांद्रयान 2 मोहिमेत शेवटच्या क्षणी विक्रम लँडरचा संपर्क तुटला होता. आता विक्रम लँडरच्या अवशेषांचा शोध घेण्यास नासाला यश आले आहे. मात्र विक्रम लँडरचा शोध घेण्यासाठी या कामगिरीत नासाची मदत चेन्नईमधील 33 वर्षीय इंजिनिअर शन्मुग सुब्रमण्यमने केली आहे.
6 सप्टेंबरला चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करताना विक्रम लँडरचा संपर्क तुटला होता. नासाने लूनर रेकॉनाईसन्स ऑर्टिबटरद्वारे काढलेले फोटो शेअर केले आहेत. नासाने म्हटले आहे की, सर्वात प्रथम शन्मुगने मुख्य क्रॅश साइटपासून लँडरचे अवशेष 750 मीटर दूर शोधले. त्या ठिकाणी एक ठिपका दिसत आहे. दोन महिन्यांपुर्वीच शन्मुगने विक्रम लँडरचा शोध लावला होता.
सुब्रमण्यमने सांगितले की, मी माझ्या दोन लॅपटॉपवर दोन फोटो ठेवून पडताळणी करत होतो. एका बाजूला जुना फोटो होता, तर दुसऱ्या बाजूला नासाने काढलेला दुसरा नवीन फोटो होता. त्या दोघांची मी तुलना केली. या शोधानंतर त्याने 3 ऑक्टोंबर ट्विट करत याबाबत माहिती देखील दिली होती. अखेर नासाने याचा शोध घेत दोन महिन्यानंतर अधिकृतरित्या विक्रम लँडरच्या अवशेषांविषयी माहिती देत शन्मुगला याचे श्रेय दिले आहे.
सुब्रमण्यम म्हणाला की, चेन्नईच्या अपार्टमेंटमध्ये मी विक्रम लँडरचा शोध घेण्यासाठी दिवसाला 7-7 तास काम करायचो. मी केवळ लॅपटॉपचा वापर केला आणि फोटो सर्च केले. त्याने पुढे सांगितले की, मी नासा आणि इस्त्रोला देखील ट्विट केले. नासाचे अनेक वैज्ञानिकांना देखील मेल पाठवले. त्यांचा चांगला प्रतिसाद आला.
मुळचा मदुरई येथील असलेला शन्मुग हा इंजिनिअर पदवीधर आहे. अंतराळाची आवड असणारा शन्मुग म्हणाला की, माझा हा शोध अनेकांना प्रेरणा देईल. मला आशा आहे की, इस्त्रो चांद्रयान -3 मिशन यशस्वीरित्या पार पाडेल.