येत्या वर्षात अनेक कंपन्या ५ जी स्मार्टफोन बाजारात आणत आहेत. त्यामुळे ५ जी खरेदीचे बेत अनेक ग्राहकांनी केले असले तरी या फोन्सच्या किमती हा अनेकांच्या काळजीचा विषय आहे. ज्यांना ५ जी फोन कमी किमतीत हवा आहे त्यांनी थोडी सबुरी दाखविली तर त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकणार आहे. चीनी स्मार्टफोन कंपनी हुवावेने ५ जी सपोर्ट असलेला बजेट फोन बाजारात आणला जात असल्याचे संकेत दिले आहेत.
सध्या बाजारात जे ५ जी फोन आहेत त्यांच्या किमती ३०० ते ४०० डॉलर्स म्हणजे २१ ते २८ हजारादरम्यान आहेत. हुवावे १५० डॉलर्स म्हणजे १०५०० रुपये दरम्यान किंमत असलेले ५ जी फोन सादर करेल असे समजते. सध्या तरी महागड्या ५ जी फोनसाठी ग्राहकांना दुसरा पर्याय नाही. गिझचायनाच्या रिपोर्ट प्रमाणे हुवावेने त्यांची ५ जी प्रोडक्ट लाईन सुरु केली असून प्रेसिडेंट यंग चायिंग यांनी २०२० च्या अखेरी कंपनी १५० डॉलर्स मध्ये ५ जी फोन मॉडेल्स सादर करेल असे संकेत दिले आहेत.
नवीन तंत्रामुळे ५ जी बजेट फोन मेनस्ट्रीममध्ये येणे सुलभ होईल असे सांगितले जात आहे. हुवावेवर अमेरिकेने बंदी घातल्यावर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला असला तरी चीन मध्ये त्यांची लोकप्रियता कायम असून मेट ३० आणि मेट ३० प्रो हे दोन ५ जी फोन त्यांनी सादर केले आहेत. या फोनना चीन मध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला असून कंपनीने एका मिनिटात १ लाख फोन विकल्याचे समजते.