भारतात अनेक शहरात मेट्रोचे काम वेगाने सुरु असून आत्तापर्यंतच्या सर्व मेट्रो जमीन, एलेव्हेटेड अथवा अंडरग्राउंड आहेत. देशातील पहिली अंडरवॉटर मेट्रो कोलकाता येथे धावणार असून कोलकाता मेट्रो रेल कार्पोरेशन हुगली नदी खाली धावणाऱ्या या ईस्टवेस्ट मेट्रोचे काम वेगाने पूर्ण करत आहे. मार्च २०२२ मध्ये हे काम पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर मेट्रो प्रवासी अंडरवॉटर मेट्रो प्रवासाचा रोमांच अनुभवू शकतील.
केएमआरसीचे व्यवस्थापकीय संचालक मानस सरकार म्हणाले आम्हाला इंडिअन रेल्वे बोर्ड कडून शेवटचा २० कोटीचा निधी मिळण्याची प्रतीक्षा आहे. या मेट्रो मार्गाचे ४८.५ टक्के फंडिंग जपान इंटरनॅशनल को.ऑप. एजन्सीने केले आहे. देशातील सर्वात पहिली मेट्रो कोलकाता येथेच १९८४ साली धावली होती. ही मेट्रो नॉर्थ साउथ असून ईस्टवेस्ट मेट्रोचा सुरवातीचा खर्च ४९०० कोटी होता आणि तिचा मार्ग १४ किमीचा होता. पण आता हा मार्ग १७ किमीचा असेल त्यामुळे तिचा खर्च ८६०० कोटींवर गेला आहे.
या अंडरवॉटर मेट्रोमधून दररोज सरासरी ९ लाख प्रवासी प्रवास करतील असा अंदाज आहे. या अंडरवॉटर मेट्रोसाठी हुगली नदीखाली ५२० मीटर लांबीचा बोगदा तयार केला जात असून हा बोगदा पार करायला मेट्रोला एक मिनिटापेक्षा कमी वेळ लागेल असेही सरकार म्हणाले. ६८ दिवसात या बोगद्याचे काम पूर्ण झाले असून त्यासाठी जर्मनीहून मशीन मागविली गेली आहेत. १५०० कामगारानी तीन शिफ्ट मध्ये रात्रंदिवस काम केले असून हा बोगदा नदीखाली ३६ मीटर खोलीवर आहे.