
टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने नेटवर्क क्षमता वाढविण्यासाठी नोकियासोबत करार केल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये 1 बिलियन डॉलरचा (जवळपास 7,636 कोटी रुपये) करार झाला आहे.
नोकियानुसार, कंपनी 2022 पर्यंत देशभरात 3 लाख रेडियो युनिट्स लावेल. याद्वारे नेटवर्क क्षमता वाढवणे आणि 5जी इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी जागा तयार करण्यास मदत मिळेल.
नोकियाचे सीईओ राजीव सुरी या कराराविषयी म्हणाले की, जगातील सर्वात मोठ्या टेलिकॉम बाजारात कनेक्टिव्हिटीच्या भविष्यासाठी हा एक महत्त्वाचा करार आहे आणि हे आमचे भारतातील स्थान दृढ करते.
भारत हे जगातील दुसरे सर्वात मोठे टेलिकॉम मार्केट आहे. नोकियानुसार, भारतात पुढील 5 वर्षात मोबाईल धारकांची संख्या तब्बल 92 कोटींपर्यंत वाढेल. नोकियाने फेब्रुवारीमध्ये आपले 2015 पासूनचे नेट प्रॉफिट 7 मिलियन यूरो असल्याचे घोषित केले होते. तसेच सीईओ देखील बदलणार असल्याची घोषणा केली होती.