हिंगोली : अॅम्ब्युलन्स वेळेवर न मिळाल्यामुळे मराठी अभिनेत्री आणि नवजात बालकाचा मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना हिंगोली जिल्ह्यात घडली. अॅम्ब्युलन्स वेळेवर मिळाली असती, तर पूजाचा मृत्यू झाला नसता, असं तिच्या कुटुंबियांनी सांगितले. पूजा जुंजर असं मृत अभिनेत्रीचे नाव आहे.
21 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होत्या. त्याच्या एकदिवसापूर्वी महाराष्ट्रात ही घटना घडली. या घटनेमुळे महाराष्ट्रातील आरोग्य सेवेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. महाराष्ट्रातील आरोग्य सेवा मोठे मोठे आश्वासन देते, पण सुविधा मात्र शुन्य, असा आरोप स्थानिक लोकांकडून करण्यात येत आहे.
20 ऑक्टोबरला रात्री पूजाला प्रसुती कळा होऊ लागल्या. त्यामुळे तिला तातडीने गोरेगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल करण्यात आले. तिथे मुलाचा जन्म झाल्यानंतर काही मिनिटानंतर पूजाचा मृत्यू झाला. पूजला गोरेगाववरुन हिगोंलीच्या रुग्णालयात दाखल करा, असं डॉक्टरांनी सांगितले होते. पण गोरेगाववरुन हिंगोलीमध्ये 40 किलोमीटरचे अंतर होते. यासाठी अॅम्ब्युलन्सची गरज होती. त्यामुळे पूजाचा मृत्यू झाला.
दरम्यान, पूजाने आतापर्यंत काही मराठी चित्रपटात मुख्य भूमिका निभावली आहे. गरोदरपणामुळे तिने कामातून ब्रेक घेतला होता. पूजाच्या मृत्यूमुळे सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.