ढाका: बांगलादेशात सध्या एका क्रेझी आंटीने चांगलाच धुमाकुळ घातला असून मुस्लिमबहुल देशात महिलांवर सामाजिक, धार्मिक बंधने आहेत. त्यातही महिलेने व्यवसाय करायचा म्हटले की अनेकांच्या पुरुषप्रधान भुवया उंचावतात. पण बांग्लादेशमधील दुसर्या क्रमांकाचे शहर चितगावमध्ये जर लाऊडस्पीकरवर ढणाढण म्युझिक लावलेली एखादी सायकल रिक्षा नजरेला पडली तर हमखास समजावे ती ‘क्रेझी आंटी’ची सायकलरिक्षा आहे.
मुसम्मत जॅस्मिन असे या क्रेझी आंटीचे नाव आहे. संपूर्ण बांगलादेशमधील ही एकमेव महिला सायकल रिक्षाचालक असून क्रेझी आंटी मुसम्मत आणि तिच्या तीन लहान मुलांना सोडून दुसर्या बाईसोबत पळून गेलेल्या तिच्या पतीच्या वाटेकडे नजर लावून बसण्यापेक्षा मुसम्मतने धडाडीने संसाराची सूत्रे हातात घेतली.
सुरुवातीला मोलकरीण म्हणून तर नंतर एका कापडगिरणीत तिने नोकरी पकडली. पण या दोन्ही नोकर्यांमधून पुरेसे पैसे मिळत नसल्याने मुसम्मतने तिच्या शेजार्याची सायकल रिक्षा काही दिवस भाड्याने घेतली आणि तिने या शारिरीक कष्टाच्या पण चांगली मिळकत देणार्या धंद्यात चांगलाच जम बसवला.
अपेक्षेप्रमाणे टोमणे आणि अपमान सहन करत करत मुसम्मतने नेटाने आपला व्यवसाय सुरू ठेवला. आपल्या बुरसटलेल्या विचारांनी तिचा अपमान करणार्यांपेक्षा आपल्या तिघा मुलांच्या शिक्षणाची तिला जास्त चिंता होती. भारतीय चलनाप्रमाणे आठवड्याचे सातही दिवस काम करत प्रत्येक दिवशी साधारण ५०० रुपये कमावणार्या मुसम्मत आंटीची बरीचशी मिळकत सायकलरिक्षाच्या भाड्यापोटीच खर्च होते. पण ती जिद्दीने हा व्यवसाय पुढे नेत आहे. तिचा नेट पाहून आधी तिच्यावर टीका करणारी तोंडे आता गपगुमान तिच्या मेहनतीची प्रशंसा करताना दिसतात.